अलिबाग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘मुख्यमंत्री पंचायतराज अभियान पुरस्कार’ स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील ‘वाडगाव’ ग्रुप ग्रामपंचायतीने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अधिकृत मूल्यमापनानुसार वाडगाव ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी करत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून, या यशामुळे संपूर्ण अलिबाग तालुक्यात ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता, प्रशासनातील कार्यक्षमता, विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी ‘मुख्यमंत्री पंचायतराज अभियान’ राबविण्यात येते. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींचे विविध निकषांवर मूल्यमापन करून गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना गौरविण्यात येते.
यंदाच्या मूल्यमापनात वाडगाव ग्रुप ग्रामपंचायतीने अत्यंत चमकदार कामगिरी करत अलिबाग तालुक्यात आपला ठसा उमटवला आहे. एकूण ९१ गुणांच्या मूल्यमापन प्रक्रियेत ग्रामपंचायतीला ८५.६३ गुण प्राप्त झाले असून, तब्बल ९४.०९८९ टक्के गुणांसह तालुकास्तरीय मानांकनात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळाला आहे.
ग्रामपंचायतीने स्वच्छता, पाणीपुरवठा, डिजिटल प्रशासन, ग्रामविकास योजना, नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकसहभाग या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. याच कामगिरीच्या जोरावर वाडगाव ग्रामपंचायतीने तालुक्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
या यशाबद्दल ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी तसेच ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही ग्रामविकासासाठी अशाच पद्धतीने कार्यरत राहण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.





