तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप; अलिबाग पोलिस ठाण्यातील महिला कर्मचारी निलंबित


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका पीडित महिला फिर्यादीला तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपावरून अलिबाग पोलिस ठाण्यात कार्यरत महिला कर्मचारी ज्योत्स्ना मासे हिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका पीडित महिलेने वरसोली येथील एका इसमाविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात संबंधित महिला फिर्यादीवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप महिला कर्मचारी ज्योत्स्ना मासे यांच्यावर करण्यात आला होता.
या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक यांनी प्रकरणाची चौकशी केली. प्राथमिक चौकशीत बाब गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.