काशीद बीच परिसरात भरधाव कारमधून ४ मुलींना बाहेर लटकवत स्टंटबाजी क्षणभरात घडला असता भीषण अपघात; व्हिडिओ व्हायरल


मुरुड (प्रतिनिधी): पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या काशीद बीच परिसरात गुरुवारी (दि. २१ मे) रात्री एक अत्यंत धक्कादायक आणि जीवघेणा प्रकार समोर आला. एमजी ग्लॉस्टर (MH 04 MD 9944) या आलिशान कारमधून चार बुरखाधारी मुलींना कारच्या बाहेर लटकवत भरधाव वेगाने फिरवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कार अतिवेगाने धावताना दिसत असून, कारच्या दोन्ही बाजूंना मुली बाहेर लटकलेल्या अवस्थेत स्पष्टपणे दिसत आहेत. हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांनी संबंधित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारचालकाने गाडी थांबवण्याऐवजी आणखी वेगाने पुढे दामटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या धोकादायक स्टंटदरम्यान क्षणभर जरी तोल गेला असता, तर मोठी दुर्घटना घडून जीवितहानी अटळ होती, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. पर्यटनस्थळ म्हणून गजबजलेल्या काशीद परिसरात अशा प्रकारे बेदरकारपणे वाहन चालवून केवळ स्वतःचाच नव्हे, तर इतर वाहनचालक, पर्यटक आणि पादचारी यांच्या जीवाशीही खेळ करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
अरुंद रस्ता, रात्रीचा अंधार आणि भरधाव वेग या तिन्ही गोष्टी एकत्र आल्याने हा प्रकार अधिकच भयावह ठरत होता. सोशल मीडियावरील रील्स, प्रसिद्धी आणि मौजमजेच्या नादात तरुणाई जीवघेणे स्टंट करत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पर्यटनस्थळांवर रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणीही जोर धरत आहे.
“नेमके कारमध्ये काय सुरू होते? हा केवळ स्टंट होता की आणखी काही?” असा सवालही उपस्थित केला जात आहे. कारण भरधाव वाहनातून बाहेर लटकणे हे केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन नसून थेट मृत्यूला आमंत्रण देणारे कृत्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुलींच्या सुरक्षेबाबत वाहनातील इतरांनी कोणतीही जबाबदारी दाखवली का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
या घटनेमुळे काशीदसारख्या पर्यटनस्थळांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिस प्रशासनाने तातडीने तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.