“हॉर्नचा त्रास, गाडीने पाठलाग; अलिबागमध्ये तरुणीची पोलिसांकडे धाव”


अलिबाग (प्रतिनिधी): एका २४ वर्षीय महिलेचा इच्छेविरुद्ध पाठलाग करून तिला वारंवार त्रास दिल्याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात एका युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतीक वडे (रा. वरसोली, ता. अलिबाग) याने संबंधित महिलेचा तिच्या नकळत पाठलाग केल्याचा आरोप आहे. महिलेचा फोन नंबर मिळवून तिच्या इच्छेविरुद्ध संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच संबंधित महिला क्लासला जात असताना आरोपीने गाडीने तिचा पाठलाग करत वारंवार हॉर्न वाजवून मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे महिला त्रस्त झाल्यानंतर तिने थेट अलिबाग पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.