अलिबाग(प्रतिनिधी): एका २४ वर्षीय तरुणीचा इच्छेविरुद्ध पाठलाग करून तिला मानसिक त्रास दिल्याच्या प्रकरणाने अलिबाग शहरात खळबळ उडाली असतानाच, या प्रकरणात तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपावरून अलिबाग पोलिस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरसोली येथील प्रतीक वडे याच्याविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित २४ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिचा वारंवार पाठलाग केला. तसेच तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्या इच्छेविरुद्ध संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
पीडित महिला क्लासला जात असताना आरोपी गाडीने तिच्या मागे येत वारंवार हॉर्न वाजवत असल्याने तिला मानसिक त्रास सहन करावा लागत होता. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिलेने अखेर अलिबाग पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडित महिला फिर्यादीवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप अलिबाग पोलिस ठाण्यात कार्यरत महिला कर्मचारी ज्योत्स्ना मासे यांच्यावर करण्यात आला होता. या आरोपाची जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली.
प्राथमिक चौकशीत आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्याने संबंधित महिला कर्मचारी ज्योत्स्ना मासे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे अलिबागमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पोलिस यंत्रणेच्या भूमिकेवरही चर्चा सुरू झाली आहे.





