प्रवाशांना त्रास; आगार परिसरात घाणीचे साम्राज्य, प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष
अलिबाग(प्रतिनिधी): अलिबाग एसटी आगार परिसरातील अनधिकृत पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून प्रवासी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एसटी बसच्या ये-जा आणि प्रवाशांच्या हालचालींसाठी राखीव असलेल्या जागेत खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे बसचालक, प्रवासी तसेच स्थानिक व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आगार परिसरात दिवसरात्र सुरक्षारक्षक तैनात असतानाही अनेक वाहने दोन-दोन दिवस उभी राहत आहेत. काही वाहनधारकांकडून पैसे घेऊन पार्किंगला मूक संमती दिली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. जर असे प्रकार खरे असतील, तर हा अत्यंत गंभीर प्रकार असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे.
एसटी आगारातील अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. आगारातील दुकानांसमोर वाहन पार्किंग केल्यामुळे ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचणेही कठीण झाले आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे.
अलिबाग शहरात डंपिंग ग्राऊंडची समस्या कायम असल्याने काही जणांकडून “एसटी डेपो परिसरात कचरा टाकण्यास परवानगी दिली आहे काय?” अशी उपरोधिक चर्चा सुरू आहे. आगार परिसरात साचलेला कचरा आणि अस्वच्छ वातावरण पाहता प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून एसटी महामंडळ आणि स्थानिक प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणात स्पष्ट भूमिका मांडावी, दोषींवर कारवाई करावी आणि आगार परिसरात शिस्तबद्ध व स्वच्छ व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.





