रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेला अद्याप काही दिवसही उलटले नसताना माणगावमध्ये १५ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने जिल्हाभर एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीची लॉजवर निर्घृण हत्या झाल्याची घटनाही समोर आली होती. सलग घडणाऱ्या अशा गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निधी राकेश उतेकर ही १५ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील विलेपार्ले येथे राहत होती. उन्हाळी सुट्ट्यांमुळे ती आई-वडील आणि भावासह माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे गावी आली होती. ती विलेपार्ले येथील शाळेत शिक्षण घेत होती आणि नुकतीच नववीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती.
सोमवारी (२५ मे) रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास निधी वडिलांच्या मोबाईलवर बोलत घराबाहेर गेली होती. मात्र त्यानंतर ती परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. रात्रीभर शोध घेऊनही काहीच माहिती न मिळाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
बुधवारी (२७ मे) घरोशीवाडी परिसरातील जंगल भागात एका मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावले असता तो मृतदेह निधीचाच असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार मृतदेहावरील जखमा पाहता हा खून असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने घटनास्थळी तपास सुरू असून विविध पुरावे गोळा करण्यात येत आहेत.
मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि संशयित व्यक्तींची चौकशी सुरू असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Home ताज्या बातम्या खोपोली दुहेरी हत्याकांडाची धग कायम असतानाच १५ वर्षीय मुलीची हत्या; जंगलात मृतदेह...





