रायगड (प्रतिनिधी) : आगामी कोकण विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, कोकणातील विधानपरिषदेची जागा कोणाच्या वाट्याला जाणार यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा माजी आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत ही जागा शिवसेनेच्याच वाट्याला आली पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली आहे.
महेंद्र दळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “कोकण विधानपरिषदेची जागा ही पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेची राहिली आहे. कोकणातील शिवसैनिकांनी अनेक वर्षे मेहनत घेत पक्षाची ताकद वाढवली आहे. त्यामुळे ही जागा दुसऱ्या पक्षाला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”
यावेळी त्यांनी सुनिल तटकरेंवर वैयक्तिक आणि राजकीय टीकाही केली. “सुनिल तटकरेंचे अस्तित्व आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणात संपले आहे. जनतेमध्ये त्यांचा प्रभाव उरलेला नाही. कोकणातील जनता आता विकास आणि प्रामाणिक नेतृत्वाला प्राधान्य देत आहे,” असा दावा दळवी यांनी केला.
महायुतीत जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चेमुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. कोकणातील विधानपरिषदेची जागा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य घटक पक्षाला मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, कोकणातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. स्थानिक नेतृत्व, पक्षसंघटना आणि मतदारसंघातील प्रभाव या मुद्द्यांवरून प्रत्येक पक्ष आपली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.
Home ताज्या बातम्या कोकण विधानपरिषदेच्या जागेवरून शिवसेना-राष्ट्रवादीत रस्सीखेच; “ही जागा शिवसेनेचीच” — महेंद्र दळवी





