नवी मुंबई (प्रतिनिधी): नवी मुंबई आणि पनवेल परिसरात रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने रिक्षा चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खारघर सेक्टर १० येथील कोपरा गावातील रहिवासी राकेश कामोटकर यांची रिक्षा अज्ञात चोरट्याने मध्यरात्री घरासमोरून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये एक तरुण रिक्षा चोरी करताना स्पष्टपणे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश कामोटकर यांनी नेहमीप्रमाणे आपली रिक्षा घरासमोर पार्क करून ठेवली होती. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने संधी साधून रिक्षा पळवून नेली. सकाळी रिक्षा जागेवर नसल्याचे लक्षात येताच त्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र रिक्षा न सापडल्याने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजमध्ये एक तरुण रिक्षा चोरी करताना स्पष्टपणे दिसून आला आहे. या घटनेनंतर खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात गेल्या काही दिवसांपासून रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. विविध पोलीस ठाण्यांमध्ये अशा प्रकारच्या अनेक तक्रारी दाखल होत असून रिक्षाचालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी गस्त वाढवून अशा चोरट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिक्षाचालक आणि नागरिकांकडून केली जात आहे.






