छंद जोपासा, यश आपोआप मिळेल : राहुल कदम


अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
अलिबाग (प्रतिनिधी) : शिक्षणासोबत एखादा छंद जोपासल्यास तो भविष्यात मोठ्या यशाचे दार उघडू शकतो. केवळ पदव्या मिळवून न थांबता कौशल्यविकास, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व घडविण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी केले.
अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन व अश्विनी टीचर्स क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी चित्रलेखा पाटील, ॲड. मानसी म्हात्रे, समीर मालोदे, तुषार थळे, अश्विनी मेहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात अलिबाग तालुक्यातील दहावीतील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी, बारावी परीक्षेत विशेष यश मिळविलेले विद्यार्थी तसेच फोटोग्राफर्स असोसिएशनच्या सदस्यांच्या पाल्यांचा सन्मान करण्यात आला.
चित्रलेखा पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाची परंपरा सातत्याने जपल्याबद्दल असोसिएशनचे कौतुक केले. तर ॲड. मानसी म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांनी आकर्षणांपासून दूर राहून ध्येयपूर्तीसाठी मेहनत घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिम सुतार यांनी केले, तर प्रास्ताविक विकास पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असोसिएशनच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.