मोकाट गुरांचा पुन्हा कहर; विद्यानगर येथे इसम जखमी वारंवार तक्रारी, बातम्यांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष कायम


अलिबाग (प्रतिनिधी) : शहरातील विद्यानगर परिसरातील माय शॉपीजवळ मोकाट गुरांच्या धडकेने एका इसमाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोकाट गुरांच्या वाढत्या उपद्रवाबाबत पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
अलिबाग शहरासह आसपासच्या अनेक गावांमध्ये मोकाट गुरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी ही जनावरे मुक्तपणे फिरताना दिसतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे. विद्यानगर येथे घडलेल्या ताज्या घटनेत एका इसमाला गुराच्या धडकेमुळे दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोकाट गुरांच्या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. तसेच विविध माध्यमांतून आणि मेट्रो रायगडच्या वृत्तांतूनही या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, अलिबाग नगरपरिषद तसेच परिसरातील संबंधित ग्रामपंचायतींकडून या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातही मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता कायम असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.
“एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मोकाट गुरांच्या मालकांवर कारवाई करून जनावरांचे नियमन करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, विद्यानगर येथील घटनेनंतर तरी संबंधित यंत्रणा जागी होऊन मोकाट गुरांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.