माणगावात हृदयद्रावक घटना; आईने चार मुलांना विष पाजल्यानंतर स्वतःही केले विषप्राशन, तिघांचा मृत्यू


माणगाव (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडीत शुक्रवारी एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. एका महिलेने आपल्या चार लहान मुलांना थंडपेयामधून विष पाजल्यानंतर स्वतःही विष प्राशन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी प्रकारात आईसह दोन मुलींचा मृत्यू झाला असून दोन मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये आशा जाधव (वय २९), नंदिनी जाधव (वय ७) आणि दुर्वा जाधव (वय ६) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी आशा जाधव आणि तिच्या दोन मुलींना मृत घोषित केले.
दरम्यान, विषबाधेमुळे गंभीर झालेल्या अन्य दोन मुलांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
आईने इतके टोकाचे पाऊल का उचलले, यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक व आर्थिक अडचणींसह विविध शक्यतांचा तपास पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण माणगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून खरवली आदिवासी वाडीत शोककळा पसरली आहे. माणगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.