सारळ येथे हायप्रोफाईल सोसायटीवर पोलिसांचा छापा; गांजा सेवन करणाऱ्या दोघांवर कारवाई, विदेशी महिलेविरोधातही गुन्हा


अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड पोलिसांनी अलिबाग तालुक्यातील सारळ येथील एका हायप्रोफाईल सोसायटीवर छापा टाकून गांजा सेवन करणाऱ्या दोन व्यक्तींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. तसेच व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव्यास असलेल्या एका विदेशी महिलेविरोधात इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्ट २०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १४ जून रोजी पहाटे सारळ (ता. अलिबाग) येथील इनर सर्कल सोसायटीमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मांडवा सागरी पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान संबंधित ठिकाणी काही व्यक्ती पार्टी करत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी पाहणी केली असता दोन व्यक्ती कागदी नळीमध्ये भरलेल्या पदार्थाचा धूर ओढताना आढळून आले. चौकशी केली असता ते गांजाचे सेवन करत असल्याची कबुली त्यांनी दिली. यामध्ये सारळ येथील ६१ वर्षीय रहिवासी आणि मुंबईतील ६५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून गांजा भरलेली कागदी नळी, अर्धवट जळालेली गांजाची नळी तसेच इतर साहित्य जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचे एकूण वजन अंदाजे ३ ग्रॅम असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब) आणि २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या कारवाईदरम्यान घटनास्थळी युक्रेन देशातील एक महिला देखील उपस्थित असल्याचे आढळले. तिच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता तिच्या व्हिसाची मुदत १२ जून २०२६ रोजी संपुष्टात आल्याचे निष्पन्न झाले. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव्य केल्याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट २०२५ च्या कलम २३(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई रायगडच्या पोलिस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक मिलिंद खोपे, मांडवा सागरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ लांडे तसेच त्यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
रायगड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अमली पदार्थांचे सेवन, विक्री किंवा साठा याबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी अथवा रायगड पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.