अलिबाग (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अलिबाग आगारातील अलिबाग-शेगाव बससेवेने विक्रमी महसूल मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १५ जून २०२६ रोजी या बसचे वाहक संदीप गोसावी आणि चालक सचिन बावस्कर यांनी एका फेरीत तब्बल १ लाख १ हजार ४६२ रुपयांचे उत्पन्न मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला. या फेरीत १०७.८८ टक्के भारमान नोंदविण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल रायगड एसटी प्रेमी संघटनेच्या वतीने चालक सचिन बावस्कर आणि वाहक संदीप गोसावी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी तसेच प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.
सत्कार समारंभाला अलिबाग आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांच्यासह रायगड एसटी प्रेमी संघटनेचे अमित कंटक, स्वप्नील भगत, संकेत पाटील, समीर रांजणकर उपस्थित होते. तसेच आगारातील कर्मचारी संदीप असलकर व रितेश पाटील यांनीही उपस्थिती दर्शविली.
अलिबाग-शेगाव मार्गावरील बससेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, या मार्गाने महसूल व प्रवासीसंख्या या दोन्ही बाबतीत उल्लेखनीय यश मिळविले आहे. चालक-वाहकांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





