अलिबाग (प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत काही नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या प्रक्रियेबाबत कोणताही गैरसमज बाळगण्याची आवश्यकता नसून मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठीच हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.
मतदार याद्यांमध्ये मृत, स्थलांतरित किंवा चुकीच्या नोंदी वगळून पात्र नागरिकांची नावे समाविष्ट करणे, तसेच प्रत्येक मतदाराची माहिती अद्ययावत ठेवणे हा या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आगामी निवडणुका पारदर्शक, निष्पक्ष आणि अचूक मतदार यादीच्या आधारे पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने हा विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे.
या मोहिमेदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरभेटी देऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
“विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. परंतु नागरिकांनी असा संभ्रम बाळगण्याचे कारण नाही. मतदार याद्या अचूक असाव्यात, हा यामागचा उद्देश आहे. यात नागरिकांनी शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे,” असे निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने नागरिकांना अफवा किंवा अपूर्ण माहितींवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच स्वीकारण्याचे आवाहन केले असून, मतदार यादीशी संबंधित कोणत्याही शंका असल्यास संबंधित बीएलओ, तहसील कार्यालय किंवा निवडणूक विभागाशी संपर्क साधावा, असेही सांगितले आहे.






