रोहा पाणीपट्टी दरवाढीवर ४ ते ५ दिवसांत निर्णयाची अपेक्षा; उपोषण तात्पुरते स्थगित


रोहा (प्रतिनिधी): रोहा-अष्टमी नगरपरिषदेने घरगुती पाणीपट्टीत केलेल्या सुमारे ५५ टक्के दरवाढीविरोधात सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्री आदिती तटकरे आणि विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत उपोषणकर्ते, नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत उपोषणकर्त्यांनी वाढीव पाणीपट्टी ही सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारी असून ती तातडीने कमी करण्याची मागणी केली. पाणी ही मूलभूत नागरी सेवा असल्याने कर आकारणी नागरिकांच्या आर्थिक क्षमतेचा विचार करून न्याय्य पद्धतीने व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावर नगरपरिषद प्रशासनाने पाणीपुरवठा विभागावरील वाढता वीज खर्च, देखभाल-दुरुस्ती, मनुष्यबळ, संचालन खर्च आणि महसुली तूट यामुळे दरवाढ अपरिहार्य असल्याचे स्पष्टीकरण दिले. दोन्ही बाजूंची भूमिका ऐकल्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व तांत्रिक, आर्थिक व कायदेशीर बाबींचा आढावा घेऊन पुढील ४ ते ५ दिवसांत न्याय्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाचा मान राखत उपोषणकर्त्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, या कालावधीत पाणीपट्टी कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास उपोषण पुन्हा सुरू करून अधिक तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला.