अलिबाग (प्रतिनिधी): आज चोंढी येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्साहात प्रारंभ झाला. चोंढी ग्रामपंचायतीचे सरपंच पिंट्या उर्फ प्रसाद गायकवाड यांच्या हस्ते श्रीजा बबीता राजेंद्र चव्हाण या चिमुकलीला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत चोंढी प्राथमिक आरोग्य केंद्रासह गावातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये पाच वर्षांखालील बालकांसाठी मोफत पल्स पोलिओ लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने गावातील प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचावे यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत जनजागृतीही करण्यात येत आहे.
यावेळी सरपंच प्रसाद गायकवाड यांनी सर्व पालकांना आपल्या पाच वर्षांखालील मुलांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा अंगणवाडी केंद्रात घेऊन जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन केले. “दोन थेंब जीवनाचे” या घोषवाक्याला प्रतिसाद देत प्रत्येक पालकाने या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.
पोलिओमुक्त चोंढी आणि पोलिओमुक्त भारत घडविण्यासाठी प्रत्येक बालकाचे लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
डाॅ. गितांजली महादेव बांगर. वैद्यकिय अधिकारी, जि. प. दवाखाना चोंढी, श्रीम .रिना पाटिल -आरोग्य सेविका ,श्री आरूण कोल्हे- आरोग्य सेवक (पर्यवेक्षक), श्रीम. श्रध्दा कीर – आशा , सुषमा जाधव – प्रशिक्षित दाई ,मिनल घरत – स्त्री परिचर, मीना नांदगावकर -सफाई कामगार कार्यक्रमा उपस्थित होते.






