अलिबाग(प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात कर्करोगाच्या तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे फिरत्या मोबाईल व्हॅनची सोय करण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये कर्करोगाच्या तपासण्या, विशेषतः स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी केली जाते. जुलै महिन्यांत रायगड जिल्ह्यामध्ये या व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांनी कॅन्सरसंबंधीच्या तपासण्या करण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात आढळणा-या प्रमुख तीन कर्करोग प्रकारांमध्ये मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग सर्वाधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. या पाश्र्वभूमीवर नागरिकांसाठी ही मोहीम मोफत राबवण्यात येत आहे. शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या विशेष कर्करोग तपासणी वाहनामध्ये डेंटल चेअर, गर्भाशय, मुख तपासणीसाठी आवश्यक बेड, तसेच विविध वैद्यकीय साधनसामग्री उपलब्ध आहे. या वाहनाच्या साहाय्याने नागरिकांची शारीरिक तपासणी करून संशयित रुग्णांची नोंद केली जात आहे. ही व्हॅन जिल्ह्यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांत जाउन तपासणी शिबिर घेतले जाते. शिबिरांतून मुख कर्करोगासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि आवश्यक असल्यास ओरल बायोप्सी, स्तन कर्करोगासाठी क्लिनिकल तपासणी आणि मेमोग्राफीसाठी रुग्णालयात विनामूल्य संदर्भ, गर्भाशय मुख कर्करोगासाठी तपासणी आणि पॅप स्मीअर चाचणी केली जात आहे.
जुलै महिन्यात या व्हॅनच्या माध्यमातून पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, तळा, माणगाव, पोलादपूर, महाड, रोहा, अलिबाग, पेण व उरण या तालुक्यांतील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. निशिकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. दयानंद सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. शीतल जोशी यांनी केले आहे.
********
पनवेल: 2 जुलै उपकेंद्र वावेघर, 3 जुलै उपकेंद्र वाजे
कर्जत: 4 जुलै प्रा.आ.केंद्र खांडस, 6 जुलै उपकेंद्र पिंगळस
खालापूर: 7 जुलै ग्रामीण रुग्णालय चैक, 8 जुलै माता-बाल आरोग्य केंद्र खोपोली, 9 जुलै नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खोपोली
सुधागड: 10 जुलै उपकेंद्र नाडसूर
तळा: 11 जुलै प्रा.आ. केंद्र मांदाड, 13 जुलै उपकेंद्र पन्हेळी
माणगाव: 14 जुलै उपकेंद्र मोर्बा, 15 जुलै उपकेंद्र मांजरवणे, 16 जुलै उपकेंद्र येलवडे
पोलादपूर: 17 जुलै प्रा.आ.केंद्र पितळवाडी, 18 जुलै उपकेंद्र सवाद
महाड: 20 जुलै प्रा.आ.केंद्र बिरवाडी, 21 जुलै उपकेंद्र भावे, 22 जुलै उपकेंद्र विन्हेरे
रोहा: 23 जुलै उपकेंद्र मेढा, 24 जुलै उपकेंद्र संभे
अलिबाग: 25 जुलै प्रा.आ.केंद्र रेवदंडा, 27 जुलै उपकेंद्र खंडाळे
पेण: 28 जुलै उपकेंद्र शिर्की, 29 जुलै उपजिल्हा रुग्णालय पेण
उरण: 30 जुलै उपकेंद्र चिरनेर





