अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीचा तीन दिवसीय अभ्यास दौरा 25 ते 27 जूनदरम्यान रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पडला. या दौ-यादरम्यान समितीच्या सदस्यांनी अंगणवाड्या, ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच विविध शासकीय संस्थांना भेटी देऊन महिला व बालविकास, आरोग्य आणि ग्रामविकास क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली.
दौ-यात रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणे ग्रामपंचायत येथे राबविण्यात येणा-या विविध विकासात्मक उपक्रमांना भेट देण्यात आली. ग्रामपंचायतीच्या लोकसहभागातून राबविण्यात येणा-या स्वच्छता, महिला सक्षमीकरण, बालविकास आणि ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांची माहिती समितीने घेतली व त्यांचे कौतुक केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भेटीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती तसेच समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. दोन्ही जिल्ह्यांतील महिला व बालकल्याण विभागाच्या कामकाजाबाबत अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली. विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचा अभ्यास करून ते रायगड जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
या अभ्यास दौ-यामुळे महिला व बालकल्याण, आरोग्य सेवा आणि ग्रामविकास क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यपद्धतींचा अभ्यास करून त्या रायगड जिल्ह्यात राबविण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास समिती सदस्यांनी व्यक्त केला. अभ्यास दौर्यात महिला बालकल्याण सभापती रसिका केणी, समिती सदस्या मानसी दळवी, सुवर्णा ठाकरे, स्मिता पाटील, विजया पाशिलकर, उर्वशी वाडकर, वर्षा दोरे, मनाली काळींजकर व समिती सचिव तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बालविकास निर्मला कुचिक यांनी सहभाग घेतला.





