रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील पोलादपूर–महाबळेश्वर मार्गावरील आंबेझाळी घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली. या घटनेमुळे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पडदा ते कुंभारणे दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि खडकांचा ढिगारा साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर साचलेली माती व दगड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, मार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे तसेच आवश्यक असल्याशिवाय या मार्गाने प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.





