रेवस येथे डिझेल तस्करी प्रकरण; तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील रेवस जेटीजवळ नवघर गावाच्या हद्दीतील समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीर डिझेल तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सागरी पोलिसांनी सुमारे १४ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, डिझेलचा साठा नेमका कुठून आणण्यात आला आणि तो कुठे विक्रीसाठी नेण्यात येणार होता, याचा तपास सुरू आहे.
मांडवा सागरी पोलिसांनी रविवारी (२९ जून) सकाळी रेवस जेटीजवळील समुद्रकिनाऱ्यावर छापा टाकून दोन मासेमारी बोटींसह मोठ्या प्रमाणात अवैधरित्या साठवलेले डिझेल जप्त केले. मासेमारी बोटींचा वापर करून विनापरवाना डिझेलची वाहतूक व विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला.
या कारवाईत गजानन यशवंत कोळी (३८), अनिल शंकर कोळी (३८, दोघेही रा. सुरकीचा पाडा, करंजा, ता. उरण) आणि योगेश जनार्दन पाटील (३२, रा. करंजा, ता. उरण) यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी ‘वाघेश्वरी साई’ आणि ‘एमएफबीआई गुरू माऊली’ या दोन मासेमारी बोटी जप्त केल्या. त्यापैकी एका बोटीत सुमारे ३ हजार ५०० लिटर अवैध डिझेल आढळून आले असून, त्याची किंमत सुमारे ३ लाख ५० हजार रुपये आहे. याशिवाय सुमारे ५ लाख रुपये किमतीची दुसरी बोट आणि इतर साहित्य असा एकूण १४ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, पुढील तपासासाठी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी (रिमांड) मंजूर केली. या प्रकरणामागील डिझेल तस्करीचे जाळे, संबंधित इतर व्यक्तींचा सहभाग आणि इंधनाचा स्रोत याचा सखोल तपास मांडवा सागरी पोलीस करत आहेत.