अलिबाग(प्रतिनिधी) : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगी निधी व दानपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या राज्यव्यापी ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आंदोलनाअंतर्गत अलिबागमध्ये काँग्रेसतर्फे शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि देणगी व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्याची मागणी करण्यात आली.
अलिबाग येथील शिवाजी महाराज स्मारकाजवळील काशी विश्वेश्वर मंदिराबाहेर दक्षिण रायगड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ मधुकर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गांधी टोपी परिधान करून ‘रघुपती राघव राजाराम’ भजनाचे सामूहिक गायन करत आंदोलन केले. सत्याग्रहाद्वारे आंदोलनकर्त्यांनी अयोध्येतील कथित देणगी गैरव्यवहाराची न्यायालयीन देखरेखीखाली निष्पक्ष, पारदर्शक आणि स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. तसेच गैरव्यवहारात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मंदिरांच्या देणगी व्यवस्थापनात पारदर्शक प्रणाली राबविण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना राजाभाऊ ठाकूर म्हणाले, “देशभरातील लाखो रामभक्तांनी अपार श्रद्धेने श्रीराम मंदिरासाठी देणग्या अर्पण केल्या आहेत. त्या श्रद्धेचा कोणत्याही प्रकारे अवमान किंवा विश्वासघात सहन केला जाणार नाही. या प्रकरणातील सत्य जनतेसमोर यावे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हीच आमची भूमिका आहे.”
या सत्याग्रहात अलिबाग, मुरूड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा आणि महाड तालुक्यांतील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्यासह तालुकाध्यक्ष सुनील थळे, योगेश मगर, भास्कर चव्हाण, जगदीश कवळे, चिंतामणी मकू, संजय सावंत, सरोज डाकी, काका ठाकूर, प्रभाकर राणे, आकाश राणे, सुचित थळे आदी उपस्थित होते.
Home ताज्या बातम्या राममंदिर देणगी कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ अलिबागमध्ये काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’






