अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग कोळीवाडा येथून कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या पारंपरिक पालखीचे आज पुन्हा अलिबाग शहरात आगमन झाले. यावेळी भाविकांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत केले. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि “आई एकवीरा माता की जय”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
पालखीच्या स्वागतासाठी अलिबागच्या माजी नगराध्यक्ष श्रीमती अक्षया नाईक तसेच वीज व बांधकाम सभापती श्री. प्रशांत मधुसूदन नाईक हे उपस्थित होते. त्यांनी पालखीचे पूजन करून आई एकवीरा देवीचे दर्शन घेत भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित नागरिकांनीही मोठ्या श्रद्धेने पालखीचे दर्शन घेत देवीकडे सुख, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
अलिबाग कोळी समाजाची अनेक वर्षांची ही धार्मिक परंपरा असून, दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने पालखी कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी रवाना होते. या सोहळ्यात कोळी बांधवांसह विविध समाजातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत परंपरा जपण्याचे कार्य करतात.
पालखीच्या स्वागतावेळी स्थानिक मान्यवर, कोळी समाजाचे पदाधिकारी, महिला, युवक आणि असंख्य भाविक उपस्थित होते. धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा हा सोहळा अलिबागकरांसाठी विशेष आकर्षणाचा ठरला.






