नवी मुंबई(प्रतिनिधी): नवी मुंबईतील ऐरोली परिसरात अकरा महिन्यांपूर्वी घडलेल्या थरारक हत्येचा पोलिसांनी उलगडा केला आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून मृतदेहाचे तीन तुकडे करत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी सुनिता कुशवाह (४०) आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती (३०) यांना अटक करण्यात आली असून मृताचे नाव बलीराम सूर्यनाथ कुशवाह (५०) आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बलीराम यांना पत्नीचे राहुलसोबत असलेले प्रेमसंबंध मान्य नव्हते. याच कारणावरून दोघांनी कट रचून त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तीन तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले. काही महिन्यांनंतर बलीराम यांच्या भावाने संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली. चौकशीत आरोपींच्या जबाबात विसंगती आढळल्यानंतर कसून तपास करण्यात आला आणि दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत.






