अलिबाग तालुका काँग्रेस अध्यक्षपदी सुनील थळे यांची नियुक्ती


अलिबाग(प्रतिनिधी) : अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते सुनील थळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्ष संघटनेने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याची ग्वाही सुनील थळे यांनी दिली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून गेली सुमारे ४० वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रियपणे कार्य करत आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी ही माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी असून, तालुक्यात काँग्रेसची संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन काम केले जाईल.
सुनील थळे यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. जिल्ह्याला राजाभाऊ ठाकूर यांच्या रूपाने तरुण, अभ्यासू आणि उमदे नेतृत्व लाभले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत काँग्रेसची विचारधारा पोहोचविणे, नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे, युवक व महिलांचा पक्षातील सहभाग वाढविणे तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणे, यावर भर दिला जाईल, असेही थळे यांनी सांगितले.
त्यांच्या नियुक्तीबद्दल काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.