अलिबाग (प्रतिनिधी): रायगड पोलिस दलाच्या यजमानपदाखाली १३ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला २१ वा कोकण परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळावा-२०२६ उत्साहात पार पडला. या स्पर्धेत कोकण परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि श्वान पथकांनी सहभाग घेत आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
मेळाव्यात सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन, अँटी-सबोटाज तपासणी, पोलिस फोटोग्राफी, पोलिस व्हिडिओग्राफी, कॉम्प्युटर अवेअरनेस आणि डॉग स्क्वॉड अशा सहा प्रमुख विषयांवरील लेखी व प्रात्यक्षिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. एकूण सहा स्पर्धा प्रकार व २० उपप्रकारांमध्ये २१ पोलिस अधिकारी, ८८ पोलिस अंमलदार आणि श्वान पथकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना २० सुवर्ण, २० रौप्य आणि १९ कांस्य पदके प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेत रायगड पोलिसांनी दैदिप्यमान कामगिरी करत ९ सुवर्ण, ६ रौप्य आणि ७ कांस्य अशी एकूण २२ पदके पटकावली आणि सर्वसाधारण विजेतेपद मिळवून प्रथम क्रमांकावर आपली मोहोर उमटवली. रत्नागिरी जिल्ह्याने दुसरे, पालघर जिल्ह्याने तिसरे, तर सिंधुदुर्ग आणि ठाणे ग्रामीण यांनी अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळवले.
स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. चंद्रकिशोर मीणा यांच्या हस्ते पदके, प्रशस्तीपत्रे आणि सर्वसाधारण विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करून करण्यात आला. तसेच स्पर्धा यशस्वी व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी योगदान देणाऱ्या परीक्षकांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी रायगडच्या पोलिस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी सर्व विजेते आणि सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करत राज्य व राष्ट्रीय स्तरावरही अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.






