वाघोडे शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण; सिकलसेल आजाराविषयी केली जनजागृती


अलिबाग(प्रतिनिधी): समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षण घेऊन यशस्वी झाले पाहिजे या विचाराने प्रोत्साहन देत, अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा वाघोडे येथील आदिवासी संवर्गातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मुंबई येथील ‘एकता इंटरप्राईजेस’च्या एकता म्हात्रे व निखिलेश म्हात्रे यांच्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी एकता म्हात्रे, निखिलेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. पूजा सुतार, जिल्हा रुग्णालयातील सिकलसेल समुपदेशक प्रतिम सुतार, लॅब तंत्रज्ञ दिपा म्हात्रे, मुख्याध्यापिका संध्या पाटील व सहाय्यक शिक्षिका श्रीमती पाटील यांच्या समवेत शाळेतील विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी ॲड. पूजा सुतार यांनी विविध शैक्षणिक खेळ घेतले आणि या खेळांच्या माध्यमातून मुलांना शाळेचे व शिक्षणाचे महत्त्व सोप्या भाषेत पटवून दिले. शिक्षणासोबतच आरोग्याची माहिती मिळण्याच्या उद्देशाने जिल्हा रुग्णालयातील सिकलसेल समुपदेशक प्रतिम सुतार यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून त्यांना सिकलसेल व थॅलेसेमिया या आजारांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच, तंत्रज्ञ दिपा म्हात्रे यांच्या सहकार्याने उपस्थित सर्वांची प्राथमिक सोल्युबिलीटी तपासणी देखील करण्यात आली.
यावेळी बोलताना एकता इंटरप्राईजेसच्या एकता म्हात्रे यांनी, भविष्यातही शालेय विद्यार्थ्यांना अन्य विविध उपक्रमांच्या माध्यमातून आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याची तयारी आपल्या मनोगतातून दर्शविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षिका श्रीमती पाटील यांनी मानले.