नगराध्यक्ष चषक’ जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ


अलिबाग(प्रतिनिधी): अलिबाग येथील स्व. नमिता नाईक क्रीडा संकुलात रविवारी (दि. १९ जुलै) ‘नगराध्यक्ष चषक’ जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. ॲक्वाटिक असोसिएशन ऑफ रायगड आणि स्व. नमिता नाईक क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेचे उद्घाटन अलिबाग नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या हस्ते झाले.

यावेळी वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक, सभापती अनिल चोपडा, माजी नगरसेवक प्रदीप नाईक, पोलीस अधिकारी किशोर साळे, नगरसेवक व नगरसेविका तसेच मोठ्या संख्येने स्पर्धक, पालक आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते. प्रारंभी श्री गणेश पूजन व स्व. नमिता नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
स्पर्धेत विविध वयोगटांतील जलतरणपटूंनी फ्रीस्टाइल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लाय प्रकारांत कौशल्याचे प्रदर्शन केले. यावेळी प्रशांत नाईक यांनी गुणवंत खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि रायगडमधून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू घडविणे हा स्पर्धेचा उद्देश असल्याचे सांगितले. माजी नगरसेवक प्रदीप नाईक यांनीही स्पर्धकांना क्रीडाभावना जपत सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आवाहन केले. स्पर्धेतील विजेत्यांना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.