अलिबाग(प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात रुजविण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘ग्रीन अलिबाग’ ग्रुपच्या वतीने रविवारी (दि. १९ जुलै) रोजी वेश्वी-कुरुळ येथील रसाणी टेकडी परिसरात वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम पार पडला. रामनाथ येथील अलिबाग नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून करंज,पिंपळ,आवळा, उंबर या देशी प्रजातींच्या २०० रोपांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपणाची आवड निर्माण व्हावी, निसर्गाशी त्यांचे नाते अधिक दृढ व्हावे तसेच भविष्यात पर्यावरणाबाबत संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडावेत या उद्देशाने ‘ग्रीन अलिबाग’ ग्रुपतर्फे हा उपक्रम मागील ०२ वर्षे सातत्याने राबविण्यात येत आहे.
या प्रसंगी रायगड जिल्हा खो खो असोसिएशन चे कार्यवाह श्री आशिष पाटील हे उपस्थित राहून ‘ग्रीन अलिबाग’ ग्रुपच्या पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण कार्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
ग्रुप तर्फे सर्व मुलांना यावेळी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच झाडांचे पर्यावरणीय महत्त्व, वृक्षांमुळे पावसाचे चक्र कसे संतुलित राहते, जैवविविधतेचे संरक्षण कसे होते व पाण्याचे संवर्धन का आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक झाड हे भविष्यातील स्वच्छ हवा, समृद्ध पर्यावरण आणि सुरक्षित जीवनाचा आधार असल्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
‘ग्रीन अलिबाग’ ग्रुपचा भविष्यात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाबरोबरच जलसंवर्धन, ई-वेस्ट व्यवस्थापन आणि पर्यावरण जनजागृती या विषयांवरही व्यापक मोहिमा राबविण्याचा मानस असून पर्यावरण संरक्षणाची ही लोकचळवळ अधिक व्यापक करण्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी ग्रुपसोबत जोडले जावे असे आवाहन यावेळी ग्रुप तर्फे करण्यात आले.
Home ताज्या बातम्या ग्रीन अलिबाग’ ग्रुपचा वृक्षारोपणाचा हरित संकल्प; शालेय विद्यार्थ्यांना मिळाली पर्यावरण संवर्धनाची शिकवण






