अलिबाग(प्रतिनिधी): अलिबाग ते रेवस या मार्गावर प्रवास करताना वाहनचालकांना आता सावधगिरी बाळगावी लागणार आहे. या मार्गांवर चिडीपाडा गावाच्या समोर एका मोरिला मोठे भागदाड पडले आहे. गेली अनेक दिवस ही मोरी खचल्याने दुर्घटनेचे संकेत देत होती.पण त्याकडे बांधकाम खात्याने गांभीर्याने पाहिले नाही.अखेर शनिवारी या मोरीवरील एक बाजू खचून त्याला भगदाड पडले .
विशेष म्हणजे दुसरी बाजू देखील धोक्याचे संकेत देत आहे.या रस्त्यावरून प्रवासी वाहने ,दुचाकी, मालवाहतूक करणारी अवजड वाहने सतत धावत असतात.एक महिन्यापूर्वी खानाव, उसर मार्गावर झालेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा विनाकारण जीव गेला..त्याची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.दरम्यान याच मार्गावरील सारळ पूल धोकादायक असल्याचा फलक बांधकाम विभागाने लावला आहे..मग त्यांना ही खचलेली मोरी दिसली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अलिबाग चौंडी मार्गे रेवस हा 23 किमी रस्ता मांडवा दस्तुरी येथून अगदी नवखार पर्यंत निमुळती आहे. 2017 मध्ये अलिबाग ते सारळपूल पर्यंतच्या रस्त्याचे झालेले डांबरीकरण खूप मजबूत झाले मात्र गेल्या वर्षी वर्षांपासून या मार्गावर छोटे छोटे खड्डे पडू लागले आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कडा खचल्या आहेत. याच मार्गावर मिळकतखार – चिडीपाडा येथे एक छोटी मोरी आहे. सतत होणारी जड,- अवजड वाहनांच्या वजनाने मोरी खचत गेली. आणि शनिवारी मोरीची एक बाजू अधिकच खचून तेथे भगदाडा पडले. त्या ठिकाणी
वाहनचालकांना कळावे म्हणून कापडी झेंडा उभारण्यात आला आहे.मात्र रात्रीच्या अंधारात खड्डा लक्षात येत नाही,त्यामुळे लवकरात लवकर,मोरीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे अशी मागणी होत आहे.






