मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप


अलिबाग (जितु शिगवण): रायगड जिल्हा परिषद शाळा, वायशेत-थळ येथे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देत शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे पंकज अंजारा, सुबोध कांबळे, वासुदेव बनकर आणि दयानंद खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत नियमित अभ्यास, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रेरित केले. तसेच शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन तसेच अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकवृंदांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत मान्यवरांचे आभार मानले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांप्रती सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला चालना देण्याचा संदेश देण्यात आला.