
अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलिसांनी किनारपट्टी सुरक्षा मोहिमेदरम्यान मोठी कारवाई करत सुमारे चार कोटी रुपये बाजारमूल्याचे अंबरग्रीस (Ambergris) जप्त केले आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ४ कोटी २५ हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली किनारपट्टी भागात विशेष गस्त आणि नाकाबंदी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग पोलिसांचे विशेष पथक २६ जुलैच्या मध्यरात्री गस्त घालत असताना चाळमाळा जेटीजवळ एका दुचाकीस्वाराची संशयास्पद हालचाल आढळली. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता त्याची ओळख राहुल पंढरीनाथ हातणी (वय ३३, रा. चाळमाळा, ता. अलिबाग) अशी पटली.
यानंतर दुचाकीची झडती घेतली असता डिकीत कपडी पिशवीमध्ये सुमारे चार किलो वजनाचे अंबरग्रीस आढळून आले. प्राथमिक अंदाजानुसार या अंबरग्रीसची बाजारातील किंमत सुमारे चार कोटी रुपये आहे. आरोपीकडून एमएच-०६ बीझेड-६३४१ क्रमांकाची ॲक्टिव्हा दुचाकीही जप्त करण्यात आली.
अंबरग्रीस हा संरक्षित सागरी जीव व्हेल यांच्याशी संबंधित पदार्थ असून, त्याची बाळगणूक, वाहतूक किंवा विक्री करणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे आरोपीला ताब्यात घेऊन जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी वन विभाग, अलिबाग यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील तसेच अलिबाग पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, समुद्रकिनारी किंवा इतरत्र अंबरग्रीससारखा संशयास्पद पदार्थ आढळल्यास तो स्वतःजवळ न ठेवता, त्याची विक्री किंवा वाहतूक न करता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास अथवा वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे.






