रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडी; कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांची कसरत


अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग–कुरूळ बायपास रस्त्यावर सुरू असलेल्या रस्ते विकासाच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. सकाळी व सायंकाळी कार्यालयीन वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या परिस्थितीत अलिबाग वाहतूक शाखेचे पोलीस मात्र दिवस-रात्र रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. उन्हाची तीव्रता आणि पावसाची रिपरिप यांची पर्वा न करता वाहतूक पोलिसांकडून विविध चौकांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने वाहनांचे नियमन केले जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यास मोठी मदत होत असून, नागरिकांनाही दिलासा मिळत आहे.

रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी संयम बाळगून वाहतूक नियमांचे पालन करावे, तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. रस्त्यावरील अडचणी असूनही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस सातत्याने मेहनत घेत असून, त्यांच्या या सेवाभावी कार्याचे वाहनचालकांकडून कौतुक केले जात आहे.