
अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड पोलिस दलातील अत्यंत निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष श्वान ‘ऑस्कर‘ याचे निधन झाले असून, त्याच्या जाण्याने पोलिस दलाने आपला एक विश्वासू सहकारी गमावला आहे. सात वर्षांच्या सेवाकाळात ऑस्करने आपल्या उत्कृष्ट घ्राणशक्ती, चपळाई आणि निष्ठेच्या बळावर अनेक गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
ऑस्करने एकूण १९४ गुन्ह्यांच्या तपासात सक्रिय सहभाग घेत अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यास पोलिसांना मोलाची मदत केली. चोरी, घरफोडी तसेच इतर गंभीर गुन्ह्यांच्या तपासात त्याने अचूक मार्गदर्शन करत आरोपींपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना सहाय्य केले. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे रायगड पोलिस दलाची कार्यक्षमता अधिक बळकट झाली आणि दलाचा गौरव वाढला.
कर्तव्याप्रती असलेली त्याची निष्ठा, धैर्य आणि सेवाभाव पोलिस दलासाठी कायम प्रेरणादायी राहील. श्वान पथकातील ऑस्कर हा केवळ प्रशिक्षित श्वान नव्हता, तर पोलिस दलाचा विश्वासू सहकारी आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणेच होता.
त्याच्या निधनाबद्दल रायगड पोलिस दलाने तीव्र शोक व्यक्त करत त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कर्तव्यनिष्ठेचा आदर्श ठरलेला वीर योद्धा ‘ऑस्कर’ याच्या कार्याची आठवण कायम स्मरणात राहील.





