खोपोलीतील झेनिथ धबधबा परिसरात पुन्हा १० ते १२ पर्यटक अडकले


अचानक पावसाचा जोर वाढल्याने नदीच्या प्रवाहात वाढ

खोपोली (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील प्रसिद्ध झेनिथ धबधबा परिसरात पुन्हा एकदा पर्यटक अडकल्याची घटना समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने सुमारे १० ते १२ पर्यटक धबधबा परिसरात अडकले असून, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर बचाव मोहीम सुरू केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासन तसेच विविध बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र नदीतील पाण्याचा वेग अत्यंत प्रचंड असल्याने बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढणे शक्य होईल, अशी प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. झेनिथ धबधबा आणि रायगड जिल्ह्यातील इतर धबधबा परिसरात पावसाळ्यात अशा घटना वारंवार घडत आहेत. अचानक वाढणारा पाण्याचा प्रवाह अनेक पर्यटकांसाठी जीवघेणा ठरत असून, यापूर्वीही अनेकांना बचाव पथकाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढावे लागले आहे. काही दुर्घटनांमध्ये पर्यटकांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. धोकादायक धबधबे, नदीकाठ आणि प्रतिबंधित पर्यटनस्थळांवर जाण्यास प्रशासनाने बंदी घातली असतानाही अनेक पर्यटक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येते. सेल्फी, रील्स आणि स्टंटबाजीच्या नादात अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. पावसाळ्यात धोकादायक पर्यटनस्थळांपासून दूर राहावे, बंदी आदेशांचे पालन करावे आणि स्वतःचा तसेच इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना केले आहे. सध्या सर्व पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचे प्रयत्न सुरू आहेत.