महसूल विभागाच्या कामबंद आंदोलनाने नागरिकांची परवड


अलिबाग (प्रतिनिधी): महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. आंदोलनामुळे महसूल विभागाची बहुतांश कार्यालये ओस पडली असून, विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना कोणतेही काम न होता रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.

जमिनीशी संबंधित दाखले, फेरफार, उत्पन्न व निवासी दाखले, सातबारा उतारे, वारसा नोंदी तसेच इतर महसुली कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक कार्यालयात येत आहेत. मात्र कर्मचारी आंदोलनात सहभागी असल्याने सर्व कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, त्यांचा वेळ आणि आर्थिक खर्चही वाढत आहे.

जाधव यांच्या तत्काळ सुटकेच्या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटनांनी २७ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे जिल्हाभरातील महसूल कार्यालयांतील नियमित कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक तोडगा काढून आंदोलन मागे घेण्यास मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आंदोलन जितके लांबेल तितकी नागरिकांची अडचण वाढणार असल्याने प्रशासनाने या प्रश्नात त्वरित हस्तक्षेप करण्याची गरज व्यक्त होत आहे.