हेमनगर येथे रायगड जिल्ह्यातील पहिल्या हरित स्मशानभूमी प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील ग्रामपंचायत कुसुंबळे हद्दीतील हेमनगर येथे रायगड जिल्ह्यातील पहिल्या लाकूड व बायोमास आधारित ‘हरित स्मशानभूमी’ (Green Crematorium) प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा सोहळा गुरुवार, दि. ३० जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावेत, लाकडांचा वापर कमी होऊन वृक्षसंवर्धनाला चालना मिळावी तसेच प्रदूषणात घट व्हावी, या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येत आहे. ग्रामीण भागात आधुनिक व पर्यावरणस्नेही अंत्यसंस्कार सुविधेच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या प्रकल्पाचे भूमिपूजन रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. रसिका राजाभाई केणी यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी प्रमुख उपस्थित होते. तसेच परिसरातील ग्रामस्थ, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी हरित स्मशानभूमीमुळे पर्यावरण संरक्षणाबरोबरच भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत विकासाचा आदर्श निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला.