
अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) आणि प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम’ (Learning Improvement Program) अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे दोन दिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले. 28 व 29 जुलै रोजी आयोजित या प्रशिक्षण कार्यशाळेला रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे, गट शिक्षणाधिकारी शर्मिला शेंडे, केंद्रप्रमुख प्रमोद पाटील तसेच प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे महाराष्ट्र कार्यक्रम प्रमुख शंकर पौळ, जिल्हा प्रमुख शलाका पिंगळे आणि प्रथमची जिल्हास्तरीय टीम उपस्थित होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी 100 दिवसांच्या लर्निंग इम्प्रूव्हमेंट प्रोग्रामची प्रभावी अंमलबजावणी, प्रत्यक्ष स्तरनिहाय अध्ययन-अध्यापन, निपुण चाचण्यांचे नियोजन, तालुका व केंद्रस्तरीय प्रशिक्षणांचे दर्जेदार आयोजन तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेत भरीव सुधारणा घडवून आणण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शाळांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी प्रत्येक स्तरावर नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी विद्यार्थ्यांच्या मूलभूत भाषा कौशल्ये आणि गणितीय संकल्पना अधिक भक्कम करण्यासाठी ‘भाषा पेटी’ आणि ‘गणित पेटी’चा प्रभावी वापर करण्यावर भर दिला. प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांना पेटीतील शैक्षणिक साहित्य आणि गुणवत्ता विकास कार्यक्रमाच्या वर्कशीट घरी सरावासाठी देऊन नियमित स्वाध्यायाची सवय विकसित करण्याचे तसेच शिकण्यात सातत्य निर्माण करणारे उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 100 टक्के विद्यार्थी ‘निपुण’ करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पर्यवेक्षक, जिल्हास्तरीय प्रशिक्षक आणि शिक्षक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत अध्ययन क्षमतांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




