
रायगड जिल्ह्यातील ११० प्रतिनिधींच्या उपस्थितीत पतसंस्थांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गास उत्साहात प्रारंभ
अलिबाग, दि. ३० (प्रतिनिधी): रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघ मर्यादित, अलिबाग, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गास गुरुवारी अलिबाग येथील जेएसएम महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. रायगड जिल्ह्यातील विविध सहकारी पतसंस्थांचे सुमारे ११० प्रतिनिधी, पदाधिकारी, संचालक, अधिकारी व कर्मचारी या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन, दीपप्रज्वलन आणि सहकार गीताने करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या ॲड. दिपक पटवर्धन यांचा रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघातर्फे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे व्यवस्थापक प्रा. एस. बी. वटाणे यांनी केले. त्यांनी प्रशिक्षण वर्गाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करत सहकारी पतसंस्थांमधील पदाधिकारी, संचालक व कर्मचाऱ्यांनी बदलत्या कायदे, नियम व आर्थिक व्यवस्थेची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दिपक पटवर्धन यांनी सहकार क्षेत्रातील पतसंस्थांची भूमिका अधोरेखित केली. ते म्हणाले, “सहकारामध्ये पतसंस्था ही एक अत्यंत महत्त्वाची व्यवस्था आहे. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत पतसंस्थांचे जाळे विस्तारले असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, लघु उद्योजक, महिला बचत गट आणि गरजू कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पतसंस्था सातत्याने करत आहेत.”
पतसंस्थांच्या ठेवींना त्यांच्या वर्गवारीनुसार अधिक सक्षम संरक्षण मिळावे यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनकडून शासन स्तरावर आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच नाममात्र सभासदांना सोनेतारण कर्ज देण्यासंदर्भातील सहकार कायद्यात सुधारणा करण्यात आली असली तरी त्यामध्ये आणखी व्यवहार्य बदल होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या आर्थिक परिस्थितीत पतसंस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा महासंघांचे सक्रिय सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघाचे अध्यक्ष ॲड. जे. टी. पाटील यांनी राज्य फेडरेशनच्या कार्याला पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली. “रायगड जिल्हा पतसंस्था महासंघ आणि जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्था राज्य फेडरेशनच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील,” असे ते म्हणाले.
प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी संचालक, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सातत्याने बदलत्या कायदे, वित्तीय नियम, लेखापरीक्षण प्रक्रिया आणि डिजिटल व्यवहारांबाबतचे ज्ञान अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सक्षम व पारदर्शक व्यवस्थापनासाठी अशा प्रशिक्षण वर्गांचा मोठा लाभ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या दिवशी पुणे येथील सी.ए. पेन्सलवार यांनी टीडीएस, आयकर आणि जीएसटी या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. करप्रणालीतील बदल, करभरणा, लेखा नोंदी आणि कायदेशीर बाबींबाबत त्यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. त्यानंतर ॲड. महेंद्र खरात यांनी आदर्श उपविधी, संचालक मंडळाची जबाबदारी, संस्थेचे प्रशासन आणि कायदेशीर कर्तव्ये यावर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी ॲड. महेंद्र खरात हे कर्जवाटप, कर्जवसुली, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम १०१ अंतर्गत कार्यवाही तसेच नियम १०७ याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रा. एस. बी. वटाणे हे नियामक मंडळ, सहकार कायद्यातील अलीकडील महत्त्वाचे बदल आणि त्यांची अंमलबजावणी या विषयांवर प्रशिक्षण देणार आहेत.
या कार्यक्रमास महासंघाचे संचालक गणेश म्हात्रे, अशोक प्रधान, प्रमोद पाटील, ॲड. के. एस. पाटील, ॲड. अच्युत पाटील, चंद्रशेखर जोशी, सौ. उषा चांदगावकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महासंघाचे सचिव योगेश मगर यांनी केले.




