समुद्रात वाया जाणारे पावसाचे पाणी अडवून ‘टँकरमुक्त अलीबाग’चे स्वप्न; पुढील पिढ्यांच्या जलसुरक्षेसाठी ॲड. अंकित बंगेरा यांची धरणाची मागणी


“आजच्या पाणीटंचाईवर नव्हे, तर पुढील अनेक दशकांच्या जलसुरक्षेवर लक्ष”; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे खंडाळे-रुळे धरणाचा प्रस्ताव

अलिबाग(प्रतिनिधी) : अलीबागला दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर तात्पुरते उपाय शोधण्यापेक्षा समुद्रात वाया जाणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करून ‘टँकरमुक्त’ आणि जलसुरक्षित अलीबाग घडविण्याचा दूरदृष्टीचा आराखडा अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक तथा भाजप नेते ॲड. अंकित बांगेरा यांनी मांडला. अलीबागच्या सर्वांगीण विकासाला दीर्घकालीन जलसुरक्षेची जोड देत त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे खंडाळे-रुळे येथे धरण उभारण्याची महत्त्वपूर्ण मागणी केली.

ॲड. बंगेरा यांनी अलीबागच्या सर्वांगीण विकासाबरोबरच दीर्घकालीन जलसुरक्षेचा विषय प्राधान्याने मांडला. त्यांनी सादर केलेल्या निवेदनात खंडाळे परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारे पाणी कोणताही उपयोग न होता धबधब्यांद्वारे थेट समुद्रात वाहून जात असल्याची बाब अधोरेखित केली. हे पाणी अडवून त्याचे नियोजनबद्ध साठवण आणि वापर झाल्यास अलीबागच्या भविष्यातील पाणीप्रश्नावर मोठ्या प्रमाणात मात करता येईल, असे त्यांनी नमूद केले.

पूर्वी खंडाळे-रुळे येथे धरण उभारण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर होता. मात्र तो केवळ कागदोपत्रीच राहिल्याने आजही त्या भागातील मौल्यवान जलसंपत्तीचा योग्य उपयोग होत नाही. त्यामुळे संबंधित प्रस्तावाची कागदपत्रे तातडीने मागवून त्याचा पुनर्विचार करण्यात यावा आणि धरण उभारणीची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी ॲड. बांगेरा यांनी केली.

या धरणामुळे अलीबाग नगर परिषदेसह चेंढरे, कुरुळ परिसरातील गावांना स्वतंत्र व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होईल. दरवर्षी उन्हाळ्यात टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ कमी होईल, भूजल पातळी सुधारण्यास मदत होईल आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजाही दीर्घकालीन पद्धतीने पूर्ण करता येतील. त्यामुळे हा प्रस्ताव केवळ आजच्या पाणीटंचाईवर उपाय नसून, पुढील अनेक दशकांसाठी अलीबागच्या जलसुरक्षेचा विकास आराखडा असल्याचे ॲड. बांगेरा यांनी स्पष्ट केले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसेच निवेदनावर आवश्यक त्या कार्यवाहीबाबत अनुकूल शेरा नोंदवत प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

अलीबागच्या विकासासाठी तात्पुरत्या उपाययोजनांपेक्षा दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता अधोरेखित करत, “समुद्रात वाहणारा प्रत्येक थेंब अडवून तो अलीबागच्या विकासासाठी वापरला गेला पाहिजे,” हा विचार पुढे आणण्याचा प्रयत्न असल्याचे ॲड. अंकित बांगेरा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘टँकरमुक्त अलीबाग’ आणि भावी पिढ्यांसाठी जलसुरक्षित अलीबाग या संकल्पनेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.