भारतीय लष्करातुन तुडाळचे भालचंद्र भगत सेवानिवृत्त, ग्रामस्थांतर्फे काढली गावात मिरवणूक


सोगाव – अब्दुल सोगावकर : देशसेवेसाठी भारतीय लष्करात दाखल झालेले अलिबाग तालुक्यातील तुडाळ गावाचे सुपुत्र भालचंद्र मनोहर भगत हे सन २००४ साली रुजू झाल्यानंतर तब्बल २२ वर्षानंतर ३१ जुलै २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्त होऊन आपल्या मूळगावी आलेल्या भारतीय सैनिकाची नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांतर्फे वाहनातून वाजतगाजत उत्साहात जंगी मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक गावात पोहचताच भालचंद्र भगत यांनी गावातील सर्व मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या सत्कार समारंभासाठी उभारलेल्या भव्य मंडपात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या स्वागतासाठी अनेक मान्यवर, मित्रपरिवार तसेच सर्व समाजातील व सर्व स्तरातील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सैनिक भालचंद्र भगत यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भालचंद्र भगत यांचे त्यांनी केलेल्या देशसेवेच्याप्रती मनोगत व्यक्त केले तर काहींनी देशभक्तीपर गीते गाऊन उत्साह वाढवला.
भालचंद्र भगत यांनी याप्रसंगी कोणकोणत्या ठिकाणी व कोणकोणत्या प्रसंगी विविध पदांवर कार्य तत्पर सेवा बजावली याबाबत सविस्तर माहिती दिली. यापुढेही जरी मी सेवानिवृत्त झालो तरी माझी देशसेवा निरंतर सुरूच राहील, असे त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
या कार्यक्रमाला भारतीय लष्करातुन निवृत्त झालेले ज्येष्ठ माजी सैनिक अमरनाथ राणे सहपत्नीक उपस्थित होते, यासोबतच श्री क्लासेस चोंढी चे संस्थापक संतोष राऊत सर, शार्दूल काठे, गणेश पाटील, योगेश पवार, वासुदेव आमले, गणेश भोईर, वडील मनोहर भगत, पत्नी, मुली व इतर नातेवाईक तसेच अनेक मान्यवर, मित्रपरिवार तसेच तुडाळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.