अलिबाग (प्रतिनिधी): यंदा मान्सून उशिराने सक्रिय झाल्यामुळे अरबी समुद्र अद्यापही खवळलेल्या अवस्थेत असून, त्यामुळे रायगड किनारपट्टीवरील मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरण्यास सावध भूमिका घेतली आहे. समुद्रातील उंच लाटा, जोरदार वारे आणि अस्थिर हवामानामुळे मासेमारीसाठी जाणे धोकादायक ठरू शकते. परिणामी अनेक मच्छीमारांनी घाई न करता समुद्र शांत होण्याची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सामान्यतः मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर बोटी समुद्रात दाखल होतात. मात्र यंदा हवामानातील बदल आणि समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे मासेमारीला अपेक्षित गती मिळालेली नाही. याचा परिणाम मच्छीमारांच्या उत्पन्नावर तसेच स्थानिक मासळी बाजारातील आवकवरही होत आहे.
मच्छीमारांचे म्हणणे आहे की, जीव धोक्यात घालून समुद्रात जाण्यापेक्षा काही दिवस प्रतीक्षा करणे अधिक योग्य आहे. समुद्र शांत झाल्यानंतरच नियमित मासेमारीला सुरुवात करण्यात येईल.
याबाबत मच्छीमार सत्यवान पेरेकर म्हणाले, “यंदा मान्सून उशिराने सक्रिय झाला. त्यामुळे समुद्र अजूनही खवळलेलाच आहे. अशा परिस्थितीत मासेमारीसाठी समुद्रात जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आम्ही घाई न करता समुद्र शांत होण्याची वाट पाहत आहोत.”





