अलिबाग(प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेतील राष्ट्रीय निवृत्ती वेतन (एनपीएस) प्रणालीचे लाभार्थी असलेल्या कर्मचा-यांसाठी कार्यशाळेचे गुरुवारी (ता.6) आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एचडीएफसी लाईफचे सुशिल शुक्ला, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुशिल शुक्ला यांनी कर्मचा-यांना मार्गदर्शन करताना, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमध्ये कर्मचा-यांच्या प्रवेशापासून ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या विविध टप्प्यांची माहिती दिली. तसेच संचित निधीतून होणा-या परतावा व ॲन्युईटी पर्चेसबाबतदेखील सखोल मागदर्शन केले. महाराष्ट्र शासनाच्या दि. 30-9-2022च्या निर्णयानुसार एनपीएस अंतर्गत स्तर-१ मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणुकीच्या विकल्पाबाबत उदाहरण देउन मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी अधिकारी व कर्मचा-यांच्या शंकांचे निरसन केले.
त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे यांनीदेखील कर्मचा-यांना डिफाॅल्ट स्किममध्ये बदल करून चांगला परतावा मिळावा याबाबत विचार करण्याचे आवाहन केले. तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी कर्मचा-यांना एनपीएसंमधील उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीबाबत सविस्तर मागर्दशन केले. तसेच टर्म इन्शाॅरन्सबाबही सविस्तर माहिती दिली.






