अलिबाग(प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेल्या सीसीएमपी (Certificate Course in Modern Pharmacology – CCMP) नोंदणी धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) यांनी राज्यभर आंदोलन पुकारले असून, त्याअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अलीबाग येथील निवासी डॉक्टरांनी गुरुवार (दि. ६ ऑगस्ट) पासून पुढील आदेश येईपर्यंत नियमित वैद्यकीय सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
MARD च्या निवेदनानुसार, प्रस्तावित CCMP नोंदणीमुळे इतर वैद्यकीय पद्धतीतील चिकित्सकांना आधुनिक वैद्यकशास्त्रातील औषधोपचार करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे ‘क्रॉस-प्रॅक्टिस’ला चालना मिळेल. याचा परिणाम पुराव्यावर आधारित आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीच्या मूलभूत तत्त्वांवर होऊन रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती निवासी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
संघटनेने स्पष्ट केले आहे की, आधुनिक वैद्यकशास्त्राचा सराव केवळ त्यासाठी आवश्यक मान्यताप्राप्त शिक्षण व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांनीच करावा. त्यामुळे शासनाने प्रस्तावित CCMP नोंदणीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी ठाम मागणी MARD ने केली आहे.
या आंदोलनादरम्यान नियमित बाह्यरुग्ण विभाग (OPD), नियमित आंतररुग्ण विभाग (IPD) सेवा, वॉर्ड राऊंड, नियोजित शस्त्रक्रिया, नियोजित वैद्यकीय प्रक्रिया, शैक्षणिक उपक्रम, केंद्रीय प्रयोगशाळा तसेच फिव्हर ओपीडी या सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
मात्र, रुग्णांची गैरसोय होऊ नये आणि जीवितहानी टाळण्यासाठी अपघात व आपत्कालीन विभाग, ट्रॉमा सेवा, अतिदक्षता विभाग (ICU), प्रसूती कक्ष, आपत्कालीन शस्त्रक्रिया, जीव वाचविणाऱ्या सर्व वैद्यकीय प्रक्रिया, आपत्कालीन प्रयोगशाळा, रक्तपेढी तसेच इतर सर्व अत्यावश्यक सेवा पूर्ववत सुरू राहणार असल्याचे MARD ने स्पष्ट केले आहे.
आंदोलनामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत, हे आंदोलन जनतेविरोधात नसून रुग्ण सुरक्षा, आधुनिक पुराव्यावर आधारित वैद्यकशास्त्राचे संरक्षण आणि आरोग्यसेवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित CCMP नोंदणीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन संबंधित घटकांशी सकारात्मक चर्चा करावी, जेणेकरून नियमित आरोग्य सेवा लवकरात लवकर पूर्ववत सुरू करता येतील, असे आवाहन महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अलीबाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Home ताज्या बातम्या CCMP नोंदणी धोरणाविरोधात MARD चे राज्यव्यापी आंदोलन; अलीबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नियमित...






