डॉक्टरांच्या आंदोलनाला तीव्र वळण; रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर


IMA, MARD, ASMI आणि सर्व स्पेशालिस्ट संघटनांची संयुक्त भूमिका; मागण्या मान्य न झाल्यास आपत्कालीन सेवांसह बेमुदत बंदचा इशारा

आंदोलनावर तोडगा निघणार? न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

अलिबाग(प्रतिनिधी): महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवरून डॉक्टरांच्या आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप आले असून, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD), असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (ASMI) तसेच सर्व स्पेशालिस्ट राज्य संघटनांनी संयुक्तपणे आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली आहे.

या आंदोलनाच्या अनुषंगाने आयएमए अलिबागच्यावतीने रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आयएमए अलिबाग अध्यक्ष डॉ. विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

संयुक्त निवेदनानुसार, शासनाशी वारंवार सकारात्मक संवाद साधूनही विशेषतः BHMS–CCMP नोंदणी प्रक्रिया, निवासी डॉक्टरांच्या सेवा, प्रशिक्षण व कल्याणाशी संबंधित मागण्यांवर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. स्पष्ट कायदेशीर व नियामक चौकटीचा अभाव आणि शासनाकडून समाधानकारक हमी न मिळाल्याने डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

डॉक्टर संघटनांच्या मते, या प्रश्नांचा थेट परिणाम रुग्णांच्या सुरक्षिततेवर, वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासावर होणार आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्रने सुरू केलेल्या नियमित व गैर-आपत्कालीन (Non-Emergency) वैद्यकीय सेवा बंद आंदोलनाला MARD, ASMI आणि सर्व स्पेशालिस्ट राज्य संघटनांनी संपूर्ण पाठिंबा दिला आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबागचे अध्यक्ष डॉक्टर विनायक पाटील यांनी सांगितले.

संयुक्त निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, शासनाने ठोस व समाधानकारक निर्णय न घेतल्यास आपत्कालीन (Emergency) वैद्यकीय सेवांसह बेमुदत सेवा बंद आंदोलन करण्यात येईल. वैद्यकीय व्यवसाय हा रुग्णहित आणि वैद्यकीय नैतिकतेशी बांधील असला तरी शासनाच्या सातत्यपूर्ण निष्क्रियतेमुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच BHMS–CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करून सर्व संबंधित प्रश्नांवर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी डॉ. समीर नाईक, डॉ. राहुल म्हात्रे, डॉ. राजेंद्र चांदोरकर, डॉ. सचिन जायभाय, डॉ. सौरभ पाटील, डॉ. सागर खेडू, डॉ. वाजे, डॉ. पूनम नाईक, डॉ. रेश्मा चेऊलकर, डॉ. शिंदे आणि डॉ. वैभव चेऊलकर, डॉ. अमृत माने उपस्थित होते.

डॉक्टर संघटनांनी शासनाला पुन्हा एकदा इशारा दिला असून, रुग्णहित लक्षात घेऊन तातडीने संवाद साधून तोडगा काढावा, अन्यथा राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या आंदोलनासंदर्भात मोठी घडामोड समोर येत आहे. डॉक्टर संघटनांमध्ये प्रसारित झालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून (Suo Motu) दखल घेतली असून, १३/१४ ऑगस्टऐवजी आज दुपारी १ वाजता तातडीची सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या संभाव्य सुनावणीकडे राज्यातील डॉक्टर, रुग्ण आणि आरोग्य क्षेत्राचे लक्ष लागले असून, आंदोलनावर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.