नवी दिल्ली (प्रतिनिधी) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील तरुणांच्या धाडसाचे, स्पष्टवक्तेपणाचे आणि देशभक्तीचे कौतुक करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये काही तरुणांसोबतचा फोटो शेअर करत, “भारताचे भविष्य पाहा – तरुण, निर्भय, स्पष्टवक्ते आणि देशभक्त. आणि पंतप्रधान व गृहमंत्री? संसदेत येण्याचे धैर्य नाही, जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमतही नाही,” असे म्हटले आहे.
या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारवर संसदेतील चर्चांपासून दूर राहण्याचा आणि जनतेच्या प्रश्नांना थेट उत्तर देण्याचे टाळत असल्याचा आरोप केला. देशातील युवक निर्भयपणे आपले मत मांडत असून लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी पुढे येत आहेत, असेही त्यांनी सूचित केले.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या पोस्टवर समर्थकांकडून तसेच विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत असून सोशल मीडियावरही या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.






