कोंडी फोडायची तर वाहतूक आराखडा मंजूर करा; अलिबागच्या संयुक्त बैठकीत जोरदार मागणी


अलिबाग(प्रतिनिधी): शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून तयार करण्यात आलेल्या वाहतूक आराखड्याला (ट्रॅफिक प्लॅन) तातडीने मंजुरी द्यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निर्णायक पाठपुरावा करण्याचा निर्णय अलिबाग नगरपरिषदेत झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

जिल्हा वाहतूक शाखेच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीस नगरपरिषदेचे पदाधिकारी, मुख्याधिकारी, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, विविध शाळांचे प्रतिनिधी आणि जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील वाहतूक कोंडीची कारणे व उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.

सेंट मेरी स्कूल, जनरल अरुण कुमार वैद्य विद्यालय तसेच इतर शाळांबाहेर पालकांच्या वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याने संबंधित शाळांनी आवारातच पार्किंगची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले. सेंट मेरी स्कूल परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून रोड मार्किंग करण्याचाही निर्णय झाला.

जेएसडब्ल्यूच्या मोठ्या इलेक्ट्रिक बसमुळे शहरात कोंडी होत असल्याने बस शहराबाहेरून वळविणे किंवा बाहेरील ठिकाणी पिक-अप व ड्रॉप पॉइंट निश्चित करण्याची सूचना कंपनीला करण्यात आली.

वाहतूक आराखड्याला मंजुरी मिळेपर्यंत महत्त्वाच्या ठिकाणी ‘नो-पार्किंग’ फलक लावण्याचा निर्णयही घेण्यात आला. आराखड्याला मंजुरी मिळाल्यास पार्किंग, वाहतूक नियोजन आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी होऊन अलिबागच्या वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाय शक्य होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.