रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी माजी आमदार पंडितशेठ पाटील यांची राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याशी भेट


जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न व विकासकामांवर स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी; राज्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामे तसेच नागरिकांशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांबाबत माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची मागणी पंडितशेठ पाटील यांनी राज्यमंत्र्यांकडे केली. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, ऊर्जा तसेच सार्वजनिक बांधकामाशी संबंधित विविध प्रश्न आणि प्रलंबित कामांना गती देण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय आवश्यक असून, स्थानिक पातळीवरील प्रश्न शासनस्तरावर मांडून त्यावर ठोस निर्णय घेणे गरजेचे असल्याचे पंडितशेठ पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पंडितशेठ पाटील यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, रायगड जिल्ह्यातील विविध विषयांवर तात्काळ सकारात्मक चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आगामी काळात रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या भेटीमुळे जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांवर शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.