अलिबाग ( प्रतिनिधी ): पीएनपी कनिष्ठ महाविद्यालय, वेश्वी, अलिबाग येथे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून निसर्गाचे दान, आरोग्यवर्धक रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा कृषी अधिकारी, अलिबाग रायगड पांडुरंग मस्के उपस्थित होते.
यावेळी पीएनपी कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र पाटील, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कार्यालयीन समन्वयक गबाजी गीते, उपप्राचार्य निशिकांत कोळसे, प्रा. तेजस म्हात्रे, प्रा. दिनेश पाटील, होली चाईल्ड सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापिका एम्. वैल्लैयम्माल, उपमुख्याध्यापिका सदाफ शहाबाजकर, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पांडुरंग मस्के यांनी रानभाज्यांचे आपल्या जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, रानभाज्यांविषयी जनमानसात जनजागृती होणे गरजेचे असून, त्यासाठी अशा प्रकारच्या प्रदर्शनांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे. पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्या कोणत्याही रासायनिक खतांशिवाय तयार होतात. त्यामुळे त्या पौष्टिक, कॅल्शियमयुक्त तसेच औषधी गुणधर्मांनी समृद्ध असून आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत निसर्गाकडून मिळणारे हे अनमोल खाद्य आहे, असे त्यांनी सांगितले.
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांची माहिती व त्यांचे महत्त्व जाणून घेत, त्यांची सांगड आधुनिक खाद्यसंस्कृतीशी घातली. आजच्या तरुणाईला आवडणारे फास्टफूडदेखील रानभाज्यांपासून शिजवून तयार करून विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यामुळे पारंपरिक रानभाज्यांना आधुनिक स्वरूप देण्याचा अनोखा प्रयत्न या प्रदर्शनातून पाहायला मिळाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नवीन पिढीमध्ये रानभाज्या खाण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत चालले आहे. रानभाज्यांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असून, ऋतूनुसार आहारामध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपली पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी सहकारी प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे त्यांनी सांगितले.
या प्रदर्शनात तब्बल १३३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी भारंग, माठ, कुर्डू, टाकळा, अळू, कवळा, कंटोळी, तसेच नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, पराठे विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून तयार केलेले विविध खाद्यपदार्थ सादर केले. सर्व पदार्थ अतिशय सुंदर पद्धतीने तयार करण्यात आले होते. परीक्षकांनी या पदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक खाद्यसंस्कृती, स्थानिक जैवविविधता आणि आरोग्यदायी आहार यांचा एक वेगळा अनुभव मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्याविष्काराचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रदर्शनात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.





