अलिबागच्या प्रांजल पाटीलने २.२ किमी अंतर अवघ्या ३ मिनिटे ५ सेकंदांत पूर्ण करत रचला नवा विक्रम
अलिबाग (प्रतिनिधी): अलिबागच्या प्रांजल पाटीलने प्रभादेवी येथील कस्टम पॉईंट वेल्फेअर सोसायटीतर्फे १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या २.२ किलोमीटर अंतराच्या सायकल शर्यतीत अव्वल कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा ‘सायकल मास्टर २०२६’ हा किताब पटकावला. विशेष म्हणजे, प्रांजलने हे अंतर अवघ्या ३ मिनिटे ५ सेकंदांत पूर्ण करून कस्टम पॉईंट वेल्फेअर सोसायटीच्या सायकल शर्यतीचा तब्बल ४५ वर्षांचा विक्रम मोडीत काढला. सलग तीन वर्षे किताब पटकावत प्रांजलने या स्पर्धेत हॅट्ट्रिक साधली आहे.
कस्टम पॉईंट वेल्फेअर सोसायटीचे हे ४६ वे वर्ष असून यंदाच्या स्पर्धेत मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच अलिबाग येथील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध वयोगटांतील महिला व पुरुष सायकलपटूंनी या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावले.
या कार्यक्रमाला स्थानिक आमदार महेश सावंत, नगरसेवक यशवंत किल्लेदार, शाखाप्रमुख संजय भगत, रेखा देवकर तसेच फिट इंडिया चे सिंग उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन आणि यशस्वी नियोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष योगेश मानकामे आणि सेक्रेटरी हरिष देसाई यांनी माहिती दिली.
विविध गटांतील विजेते
सायकल मास्टर २०२६ : प्रथम क्रमांक प्रांजल पाटील, द्वितीय देवर्षी पाटील, तृतीय बल्या हिरेमठ.
लिटिल सायकल मास्टर २०२६ : प्रथम आर्यन जाधव, द्वितीय दिग्विजय नवले, तृतीय दर्श चुणेकर.
ज्युनियर सायकल मास्टर २०२६ : प्रथम आर्यन लोहार, द्वितीय सार्थक प्रसाद, तृतीय गौरव ढवळे.
महिला सायकल मास्टर २०२६ : प्रथम जुई नारकर, द्वितीय श्रावणी घोडेस्वार, तृतीय ऐश्वर्या दुधाळे.
१० वर्षांखालील सायकल शर्यत : प्रथम स्वजस परब, द्वितीय श्रेयश घरत, तृतीय ध्येय सावंत.
खुला गट – गिअर असलेली सायकल : प्रथम श्रीकांत खडतर, द्वितीय वेदांत पानसरे, तृतीय जिविन मार्लेशा.
४० वर्षांवरील सीनियर सायकल मास्टर २०२६ : प्रथम किरण पवार, द्वितीय रमेश गौतम, तृतीय राजू म्हात्रे.
प्रांजल पाटीलच्या विक्रमी कामगिरीमुळे अलिबागच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, सलग तीन वर्षे ‘सायकल मास्टर’ किताबावर आपले नाव कोरणाऱ्या प्रांजलच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.









